श्रीरामा घनश्यामा बघशिल कधि तू रे ?
तुझी लवांकुश बाळे
वनवासाच्या घरात माझ्या अरुण चंद्र हे सवे जन्मता
विरह प्रीतिचे दु:खही माझे हसले रघुनाथा
विश्वाची मी मंगल माता तुझी लाडकी सीता
तुझ्याविना रे आनंदाला गालबोट लागले
रूप मनोहर तुझी पाहिली यौवनातली कांती
बाळांच्या या रूपे बघते तुझ्याच चिमण्या मूर्ती
पूर्ण पाहिले तुला राघवा तरिही दैवगति
तुझे बालपण तुझ्यापरी का वनवासी झाले
बघायचे जर नसेल मजला ये ना बाळांसाठी
चार करांचा कोमल विळखा पडु दे शामलकंठी
ताटातुटीच्या भेटी घडता झरझर अमृत ओठी
मिटुनी डोळे म्हणेन माझे रामायण संपले
गीत - पी. सावळाराम
संगीत - वसंत प्रभू
स्वर - लता मंगेशकर
राग - मिश्र रागेश्री (नादवेध)
मानवतेचे मंदिर माझे, आत लाविल्या ज्ञानज्योती
श्रमिक हो, घ्या इथे विश्रांती !
बंधुत्वाची येथ सावली, अनाथ अमुचे मायमाउली
कधी दिसे का ईश राउळी ? देव ते अंतरात नांदती !
आम्ही लाडके विठुरायाचे, लेणे जरिही दारिद्र्याचे
अभंग ओठी मानवतेचे, मृदुंगी वेदनेस विस्मृती !
दार घराचे सदैव उघडे, भागवताची ध्वजा फडफडे
भावभक्तीचे आम्हा साकडे, पथिक ते परंपरा सांगती !
गीत - रवींद्र भट
संगीत - सुधीर फडके
स्वर - सुधीर फडके
चित्रपट - ते माझे घर (१९६०)
ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी
भेटीत तृष्टता मोठी
त्या कातरवेळा थरथरती कधि अधरी
त्या तिन्हीसांजांच्या आठवणी त्या प्रहरी
कितिदा आलो, गेलो, रमलो
रुसण्यावाचुनि परस्परांच्या कधी न घडल्या गोष्टी
कधि तिने मनोरम रुसणे
रुसण्यात उगीच ते हसणे
म्हणून ते मनोहर रुसणे
हसणे, रुसणे, रुसणे, हसणे
हसण्यावरती रुसण्यासाठी, जन्मजन्मिच्या गाठी
कधि जवळ् सुखाने बसलो
दुःखात सुखाला हसलो
कधि गहिवरलो, कधि धुसफुसलो
सागरतीरी आठवणींनी वाळूत मारल्या रेघा,
जन्मासाठी जन्म जन्मलो, जन्मात जमली ना गट्टी
गीत - बाळ कोल्हटकर
संगीत - वसंत देसाई
स्वर - वाणी जयराम, पं. कुमार गंधर्व
नाटक - देव दीनाघरी धावला
ऋतु हिरवा ऋतु बरवा पाचूचा वनि रुजवा
युग विरही हृदयांवर, सरसरतो मधु शिरवा
भिजुनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती
नितळ निळ्या अवकाशी, मधुगंधी तरल हवा
मनभावन हा श्रावण, प्रियसाजण हा श्रावण
भिजवी तन, भिजवी मन हा श्रावण
थरथरत्या अधरांवर, प्रणयी संकेत नवा
नभी उमटे इंद्रधनू, मदनाचे चाप जणू
गगनाशी धरणीचा, जुळवितसे सहज दुवा
गीत - शांता शेळके
संगीत - श्रीधर फडके
स्वर - आशा भोसले
मी बोलले न काही नुसतेच पाहिले
हृदयात दाटलेले हृदयात राहिले
परतून हाय जाण्या ओठांत शब्द आले
डोळ्यांतले इषारे डोळ्यांत कैद झाले
मी बंद पापण्यांनी हे सर्व साहिले
देऊन सर्व काही नाही दिलेच काही
ज्याला हवे कळाया कळलेहि त्यास नाही
माझ्याच अंतरी मी हे फूल वाहिले
निःशब्द आसवांनी समजाविले मनाला
की शाप वेदनेचा प्रीतीस लाभलेला
माझ्याच मी मनाशी हे गीत गायिले
गीत - मंगेश पाडगावकर
संगीत - विश्वनाथ मोरे
स्वर - सुमन कल्याणपूर
श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा
उलगडला झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा
जागुनि ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी
जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी
माझ्याही ओठांवर आले नाव तुझेच उदारा
रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी
निळ्या रेशमी पाण्यावरती थेंबबावरी नक्षी
गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा
पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदिचे आले
माझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरू झाले
मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा
पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेशा
अशा प्रीतिचा नाद अनाहत, शब्दावाचुन भाषा
अंतर्यामी सूर गवसला, नाही आज किनारा
गीत - मंगेश पाडगावकर
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर - लता मंगेशकर
ॐकार स्वरूपा, सद्गुरू समर्था
अनाथाच्या नाथा, तुज नमो
तुज नमो, तुज नमो, तुज नमो ॥१॥
नमो मायबापा, गुरुकृपाघना
तोडी या बंधना मायामोहा
मोहोजाळ माझे कोण नीरशील
तुजविण दयाळा सद्गुरुराया ॥२॥
सद्गुरुराया माझा आनंदसागर
त्रैलोक्या आधार गुरुराव
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश
ज्यापुढे उदास चंद्र-रवि
रवि, शशी, अग्नि, नेणती ज्या रूपा
स्वयंप्रकाशरूपा नेणे वेद ॥३॥
एका जनार्दनी, गुरू परब्रम्ह
तयाचे पैनाम सदामुखी ॥४॥
रचना - संत एकनाथ
संगीत - श्रीधर फडके
स्वर - सुरेश वाडकर