मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते,
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !
आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते,
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते
सावरते, बावरते, घडते, अडखळते का पडते ?
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते
मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते
अन् क्षणात फिरुनी आभाळाला भिडते !
मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !
रुणझुणते, गुणगुणते, कधी गुंतते, हरवते,
कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते
तळमळते सारखे भाबडे नकळत का भरकटते ?
कधी मोहच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते !
जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते ?
भाबडे तरी भासांच्या मागून पळते !
मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते !
गीत - गुरू ठाकुर
संगीत - अजय, अतुल
स्वर - शंकर महादेवन
चित्रपट - अगं बाई .... अरेच्चा ! (२००४)
आलि आलि सुगि, म्हणून चालले बिगि बिगि
गोष्ट न्हाइ सांगण्याजोगि
कुनी गालावर मारली टिचकी
मला लागली कुणाची उचकी
( कुणाची गं कुणाची ? ह्याची का त्याची ? लाजू नको, लाजू नको )
तरणीताठी, नार शेलाटी, चढले मी बांधावर
अटकर बांधा, गोरा गोरा खांदा, पदर वाऱ्यावर
कानामध्ये चाहुल, वाजलं त्याचं पाउल
माझ्या उरात भरली धडकी
निजले डाव्या कुशी, हाताची उशी, करुन मी कशी
वाऱ्याच्या लाटा, थंडीचा काटा, मनात न्यारी खुषी
सपनात आला, त्यानं छेडलं बाई मला
त्याच्या डोळ्याची नजर तिरकी
उठून सकाळी, लइ येरवाळी, गेले पानठ्यावरी
उन्हात बसले न्हात, अंगाला पानि गुदगुल्या करी
पाण्यामध्ये दिसं, त्याचं लागलं मला पिसं
त्यानं माझीच घेतली फिरकी
गीत - जगदीश खेबुडकर
संगीत - राम कदम
स्वर - उषा मंगेशकर
चित्रपट - पिंजरा (१९७२)
ऐन दुपारी, यमुनातीरी, खोडी कुणी काढली
बाई माझी करंगळी मोडली
जळी वाकुन मी घट भरताना
कुठुन अचानक आला कान्हा
गुपचुप येऊनी पाठीमागुनी, माझी वेणी ओढली
समोर ठाके उभा आडवा
हातच धरला माझा उजवा
मीही चिडले, इरेस पडले, वनमाला तोडली
झटपटीत त्या कुठल्या वेळी
करंगळी हो निळसर काळी
का हृषिकेशी मम देहाशी निजकांती जोडली
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - दत्ता डावजेकर
स्वर - आशा भोसले
चित्रपट - पडछाया (१९६५)
मधु इथे अन् चंद्र तिथे, झुरतो अंधारात
झुरतो अंधारात, अजब ही मधुचंद्राची रात
एक चंद्र अन् अगणित तारे, दो हृदयांवर किती पहारे
हवी झोपडी, मिळे कोठडी, सरकारी खर्चात
सरकारी खर्चात, अजब ही मधुचंद्राची रात
माहेराला सोडुन फसले, नशिबी आले सासर असले
ताटातुटीने सुरेख झाली, संसारा सुरवात
संसारा सुरवात, अजब ही मधुचंद्राची रात
किती पाहुणे किती निमंत्रित, जमले सारे एका पंक्तीत
अशी निघाली लग्नानंतर, वाऱ्यावरची वरात
वाऱ्यावरची वरात, अजब ही मधुचंद्राची रात
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - एन्. दत्ता
स्वर - आशा भोसले, महेंद्र कपूर
चित्रपट - मधुचंद्र (१९६७)
मन वढाय वढाय
उभ्या पीकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरी येतं पिकांवर
मन मोकाट मोकाट
याच्या ठाई ठाई वाटा
जशा वाऱ्यानं चालल्या
पान्यावऱ्हल्या रे लाटा
मन लहरी लहरी
त्याले हाती धरे कोन ?
उंडारलं उंडारलं
जसं वारा वहादनं
मन पाखरू पाखरू
याची काय सांगू मात ?
आता व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायात
मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर
अरे, इचू, साप बरा
त्याले उतारे मंतर !
मन चपय चपय
त्याले नही जरा धीर
तठे व्हयीसनी ईज
आलं आलं धर्तीवर
मन एवढं एवढं
जसा खाकसंचा दाना
मन केवढं केवढं ?
आभायात बी मायेना
देवा, कसं देलं मन
आसं नही दुनियांत !
आसा कसा रे तू योगी
काय तुझी करामत !
देवा आसं कसं मन ?
आसं कसं रे घडलं ?
कुठे जागेपनी तूले
असं सपनं पडलं !
रचना - संत बहिणाबाई
संगीत - वसंत पवार
स्वर - आशा भोसले
चित्रपट - मानिनी (१९६१)
बाई बाई, मन मोराचा कसा पिसारा फुलला
चिमनी मैना, चिमना रावा
चिमन्या अंगणी, चिमना चांदवा
चिमनी जोडी, चिमनी गोडी
चोच लाविते, चिमन्या चाऱ्याला
चिमनं, चिमनं, घरटं बांदलं, चिमन्या मैनेला
शिलेदार घरधनी माझा, थोर मला राजांचा राजा
भोळा भोळा जीव माजा जडला त्याच्या पायाला
रे मनमोरा, रंगपिसारा, अंगी रंगुनि जीव रंगला
गोजिरवानी, मंजुळ गानी, वाजविते बासरी डाळिंब ओठाला
येडं, येडं, मन येडं झालं, ऐकुन गानाला
गीत - जगदीश खेबुडकर
संगीत - आनंदघन
स्वर - लता मंगेशकर
चित्रपट - मोहित्यांची मंजुळा (१९६०)
माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं
गुलाब, जाई, जुई, मोगरा फुलवीतं
दादाच्या मळ्यामंदी, मोटंचं मोटं पानी
पाजिते रान सारं, मायेची वयनी
हसत डुलत, मोत्याचं पीक येतं
लाडकी ल्येक राजाचा ल्योक
लगीन माझ्या चिमनीचं
सावळा बंधुराया, साजिरी वयनीबाई
गोजिरी शिर्पा हंसा, म्हायेरी माज्या हाय
वाटेनं म्हयेराच्या धावत मन जातं
गडनी, सजनी, गडनी सजनी गडनी ग
राबतो भाऊराया, मातीचं झालं सोनं
नजर काढू कशी, जीवाचं लिंबलोनं
मायेला पूर येतो, पारुचं मन जातं
गीत - योगेश
संगीत - आनंदघन
स्वर - लता मंगेशकर
चित्रपट - साधी माणसं (१९६३)
बुगडि माझी, सांडलि ग,
जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला
चुगलि नगा, सांगू ग,
माझ्या म्हताऱ्याला ग माझ्या म्हाताऱ्याला !
माझ्या शेजारी तरूण राहतो
टकमक टकमक मला तो पाहतो
कधि खुणेने जवळ बाहतो
कधि नाही ते भुलले ग बाई,
त्याच्या इशाऱ्याला, त्याच्या इशाऱ्याला !
आज अचानक घरी तो आला
पैरण, फेटा नि पाठीस शेमला
किती गोड तो मजसी गमला
दिला बसाया पाट मी बाई,
त्याला शेजाऱ्याला, माझ्या शेजाऱ्याला !
घरात नव्हते तेव्हा बाबा
माझा मजवर कुठला ताबा
त्याची धिटाई-तोबा तोबा !
वितळू लागे ग बाई लोणी,
बघता निखाऱ्याला, बघता निखाऱ्याला !
त्याने आणिली अपुली गाडी
तयार जुंपुनि खिलार जोडी
मीहि ल्याले ग पिवळी साडी
वेड्यावाणी जोडीने ग गेलो,
आम्ही बाजाराला, आम्ही बाजाराला !
येण्याआधी बाबा परतून
पोचणार मी घरात जाउन
मग पुसतील काना पाहून
काय तेव्हा सांगू मी ग बाई,
त्याला बिचाऱ्याला, त्याला बिचाऱ्याला !
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - राम कदम
स्वर - आशा भोसले
चित्रपट - सांगते ऐका (१९५९)
बहरला पारिजात दारी
फुले का, पडती शेजारी ?
माझ्यावरती त्यांची प्रीती
पट्टराणि जन तिजसी म्हणती
दुःख हे, भरल्या संसारी !
असेल का हे नाटक यांचे,
मज वेडीला फसवायाचे ?
कपट का, करिति चक्रधारी ?
वारा काही जगासारखा
तिचाच झाला पाठीराखा
वाहतो, दौलत तिज सारी !
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - माणिक वर्मा
चढाओढीने चढवीत होते
ग बाई मी पतंग उडवीत होते
होता झकास सुटला वारा
वर पतंग अकरा-बारा
एकमेकांना अडवित होते
ग बाई मी पतंग उडवीत होते
काटाकाटीस आला ग रंग
हसू फेसाळ घुसळीत अंग
दैव हारजीत घडवीत होते
ग बाई मी पतंग उडवीत होते
माझ्या दोऱ्यानं तुटला दोरा
एक पतंग येई माघारा
गेला गुंतत गिरवीत गोते
ग बाई मी पतंग उडवीत होते
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - आशा भोसले
चित्रपट - लाखात अशी देखणी (१९७१)