कुण्या गावाचि, कुण्या नावाचि,
कुण्या राजाचि, तू ग राणी
आली ठुमकत, नार लचकत,
मान मुरडत, हिरव्या रानी
खुळू-खुळू घुंगराच्या, तालावर झाली दंग
शालू बुट्टेदार, लई लई झाला तंग
सोसंना भार, घामाघूम झालं अंग
गोऱ्या रंगाचि, न्याऱ्या ढंगाचि
चोळि भिंगाचि, ऐन्यावानी
डळिंबाचं दाणं तुझ्या, पिळलं ग व्हटावरी
गुलाबाचं फूल तुझ्या, चुरडलं गालावरी
कबूतर येडं खुळं, फिरतया भिरी भिरी
तुझ्या नादानं, झालो बेभान
जीव हैरान, येड्यावानी
कवळ्यात घेऊनीया, अलगद उचलावं
मऊ मऊ हिरवाळीत, धैवरात भिजवावं
पिरतीचं बेन तुझ्या, काळजात रुजवावं
लाडीगोडीनं, पुढल्या ओढीनं
जाउ जोडीनं, राजा-रानी
गीत - जगदीश खेबुडकर
संगीत - राम कदम
स्वर - विष्णू वाघमारे ’वाघ्या’
चित्रपट - पिंजरा (१९७२)
अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तंव्हा मिळते भाकर !
अरे, संसार संसार, खोटा कधी म्हनू नहीं
राउळाच्या कयसाले, लोटा कधी म्हनू नहीं
अरे, संसार संसार, नही रडनं, कुढनं
येड्या, गयांतला हार, म्हनू नको रे लोढनं !
अरे, संसार संसार, खीरा येलावरचा तोड
एक तोंडामधी कडू, बाकी अवघा लागे गोड
अरे, संसार संसार, म्हनू नको रे भीलावा
त्याले गोड भीमफूल, मधी गोडंब्याचा ठेवा
देखा संसार संसार, शेंग वरतून काटे
अरे, वरतून काटे, मधी चिक्ने सागरगोटे
ऐका, संसार संसार, दोन्ही जीवांचा इचार
देतो सुखाले नकार, अन् दुःखाले होकार
देखा, संसार संसार, दोन जीवांचा सुधार
कदी नगद उधार, सुखदुःखाचा बेपार !
अरे, संसार संसार, असा मोठा जादूगार
माझ्या जीवाचा मंतर, त्याच्यावरती मदार
असा, संसार संसार, आधी देवाचा ईसार
माझ्या देवाचा जोजार, मग जीवाचा आधार !
रचना - संत बहिणाबाई
संगीत - वसंत पवार
स्वर - सुमन कल्याणपूर
चित्रपट - मानिनी (१९६१)
अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाला टांगला
पिलं निजली खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव
जीव झाडाले टांगला
खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखरांची कारागिरी
जरा देख रे मानसा
तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं
रचना - संत बहिणाबाई चौधरी
संगीत - वसंत पवार
स्वर - सुमन कल्याणपूर
चित्रपट - मानिनी (१९६१)
आकाशी झेप घे रे, पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा
तुजभवती वैभव, माया
फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या, घेसी आसरा
घर कसले ही तर कारा
विषसमान मोती चारा
मोहाचे बंधन द्वारा
तुज आडवितो हा कैसा, उंबरा
तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने
दरि, डोंगर, हिरवी राने
जा ओलांडुन या सरिता, सागरा
कष्टाविण फळ ना मिळते
तुज कळते, परि, ना वळते
हृदयात व्यथा ही जळते
का जीव बिचारा होई बावरा
घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले
हा योग जीवनी आला, साजिरा
गीत - जगदीश खेबुडकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - सुधीर फडके
चित्रपट - आराम हराम आहे (१९७६)
आला आला वारा संगे पावसाच्या धारा
पाठवणी करा सया निघाल्या सासुरा
नव्या नवतीचं बाई लकाकतं रूप
माखलं ग ऊन जणू हळदीचा लेप
ओठी हसू पापणीत आसवांचा झरा
आजवरी यांना किती जपलं जपलं
काळजाचं पानी किती शिपलं शिपलं
चेतवून प्राण यांना दिला ग उबारा
येगळीच माती आता येगळीच दुनिया
आभाळाची माया बाई करील किमया
फुलेल ग पावसानं मुलुख हा सारा
गीत - सुधीर मोघे
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - आशा भोसले, अनुराधा पौडवाल
चित्रपट - हा खेळ सावल्यांचा (१९७६)
आम्ही ठाकरं ठाकरं या रानाची पाखरं
या जांभऱ्या गर्दीत मांडुन इवले घर
या पिकल्या शेतावर, तुझ्या आभाळाचा थर
या डोंगर वस्तीवर भोळ्या संभूची पाखर
त्याच्या पंखात पंखात नांदतोया संसार
आल्या बरसाती घेऊन मेघमल्हाराची धून
त्या झिंगल्या झाडांना बांधले पैंजण
चांदण्या गोंदून धरलीया झालर
गीत - ना. धों. महानोर
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - रवींद्र साठे, चंद्रकांत कुलकर्णी
चित्रपट - जैत रे जैत (१९७७)
उषःकाल होता होता काळरात्र झाली !
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली !
आम्ही चार किरणांचीही आस का धरावी ?
जे कधीच नव्हते त्यांची वाट का पहावी ?
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली !
तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी;
तोच दंश करिती आम्हा साप हे विषारी !
आम्ही मात्र ऐकत असतो आमुची खुषाली !
तिजोऱ्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती,
आम्हावरी संसारची उडे धूळमाती !
आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतही ना वाली !
अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी ?
असा कसा जो तो येथे होतसे खरेदी ?
ह्या अपार दुःखाचीही चालली दलाली !
उभा देश झाला आता एक बंदिशाला
जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला !
कसे पुण्य दुर्दैवी अन् पाप भाग्यशाली !
धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे !
अजुन रक्त मागत उठती वधस्तंभ सारे !
आसवेच स्वातंत्र्याची अम्हाला मिळली !
गीत - सुरेश भट
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - आशा भोसले, रवींद्र साठे
चित्रपट - सिंहासन (१९७९)
इये मराठीचिये नगरी राम राम मंडळी, या हो
या हो अमुच्या घरी, घरी
गोड करा गूळ-पाणी, शाळूची भाकरी
क्रिष्णेच्या पाण्याला, गंगेची माधुरी
प्यार आम्हा त्यागाची, शौर्याची शाहिरी
भाव भुकेले आम्ही, आमुची भारत ही पंढरी
गीत - वसंत कानेटकर
संगीत - वसंत देसाई
स्वर - पं. वसंतराव देशपांडे
चित्रपट - इये मराठीचिये नगरी (१९६५)
अ आ आई, म म मका
मी तुझा मामा दे मला मुका
प प पतंग आभाळात उडे
ढ ढ ढगांत चांदोमामा दडे
घ घ घड्याळ, थ थ थवा
बाळ जरि खट्याळ, तरि मला हवा
ह ह हम्मा गोड दूध देते
च च चिऊ अंगणात येते
भ भ भटजी, स स ससा
मांडिवर बसा नि खुदकन हसा
क क कमळ पाण्यावर डुले
ब ब बदक तुरुतुरु चाले
ग ग गाडी झुक झुक जाई
बाळ माझे कसे गोड गाणे गाई
गीत - मधुसूदन कालेलकर
संगीत - राम कदम
स्वर - मन्ना डे
चित्रपट - एक धागा सुखाचा (१९६०)