सुन्यासुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे
अजूनही वाटते मला की, अजूनही चांदरात आहे
उगीच स्वप्नात सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू ?
दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे ?
कळे न तू पाहशी कुणाला ? कळे न हा चेहरा कुणाचा ?
पुन्हा पुन्हा भास होत आहे तुझे हसू आरशात आहे !
उगाच देऊ नकोस हाका, कुणी इथे थांबणार नाही
गडे, पुन्हा दूरचा प्रवासी कुठेतरी दूर जात आहे
सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे !
गीत - सुरेश भट
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - लता मंगेशकर
चित्रपट - उंबरठा (१९७७)
हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी
दिसशी तू, दिसशी तू, नवतरुणी काश्मिरी !
बघ निळ्सर पाणी झेलमचे झुळझुळे
हे गवत नव्हे ग पिवळे केशर मळे
ही किमया घडते केवळ प्रीतीमुळे
उघडे डोंगर आज हिमाचे मुगुट घालिती शिरी
रुसलास उगा का जवळी येना जरा
गा गीत बुलबुला माझ्या प्रितपाखरा
हा राग खरा की नखऱ्याचा मोहरा
कितीवार मी मरू तुझ्यावर, किती करु शायरी
हर रंग दाविती, गुलाब गहिरे फिके
तुज दाल सरोवर दिसते का लाडके
पाण्यात तरंगे घरकुलसे होडके
त्यात बैसुनी मधुचंद्राची रात करू साजरी
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - एन्. दत्ता
स्वर - महेंद्र कपूर
चित्रपट - मधुचंद्र (१९६७)
संथ वाहते कृष्णामाई
तीरावरल्या सुखदुःखाची, जाणीव तिजला नाही
नदी नव्हे ही निसर्ग नीती, आत्मगतीने सदा वाहती
लाभहानिची लवही कल्पना, नाही तिज ठायी
कुणी नदीला म्हणती माता, कुणी मानिती पूज्य देवता
पाषाणाची घडवुन मूर्ती, पूजित कुणी राही
सतत वाहते उदंड पाणी, कुणी न वळवुन नेई रानी
आळशास ही व्हावी कैसी, गंगा फलदायी ?
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - दत्ता डावजेकर
स्वर - सुधीर फडके
चित्रपट - संथ वाहते कृष्णामाई (१९६७)
रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा
संपेल ना कधीही, हा खेळ सावल्यांचा
हा चंद्र ना स्वयंभू, रवी तेज वाहतो हा
ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा
प्रीतीस होई साक्षी, हा दूत चांदण्यांचा
आभास सावली हा, असतो खरा प्रकाश
जे सत्य भासती ते, असती नितांत भास
हसतात सावलीला, हा दोष आंधळ्यांचा
या साजीऱ्या क्षणाला, का आसवे दिठीत
मिटतील सर्व शंका, उबदार या मिठीत
गवसेल सूर आपुल्या, या धुंद जीवनाचा
गीत - सुधीर मोघे
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - महेंद्र कपूर
चित्रपट - हा खेळ सावल्यांचा (१९७६)
स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी
हृदयी अमृत, नयनी पाणी
तुझिया पोटी अवतरती नर
अन्यायच ते करिती तुझ्यावर
दासी म्हणुनि नमविति चरणी !
कुशीत तुझिया पुरुष धुरंधर
अबला परि तू ठरिसि जगावर
दशा तुझी ही केविलवाणी !
सुंदरता तुज दिधली देवे
तुझी तुला ती परि न पेलवे
क्ष्णात ठरसी तूच पापिणी !
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - वसंत पवार
स्वर - सुधीर फडके
चित्रपट - बाळा जो जो रे (१९५१)
स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला
गतजन्मीची खूण सापडे, ओळखले का मला
वदलीस तू, मी सावित्री ती
शकुंतला मी, मी दमयंती
नाव भिन्न परी मी ती प्रिती
चैतन्याचा पूर तेधवा गंगेला पातला
अफाट जगती जीव रजःकण
दुवे निखळता कोठुन मीलन
जीव भुकेला हा तुजवाचुन
जन्मांमधूनी पिसाट फिरता, भेट घडे आजला
गीत - शंकर वैद्य
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - अरुण दाते
भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी
सैनिक हो तुमच्यासाठी
वावरतो फिरतो आम्ही नित्यकर्म अवघे करतो
राबतो आपुल्या क्षेत्री चिमण्यांची पोटे भरतो
परि आठव येता तुमचा आतडे तुटतसे पोटी
आराम विसरलो आम्ही आळसा मुळी ना थारा
उत्तरेकडुनि या इकडे वार्तांसह येतो वारा
ऐकता कथा अश्रुंची डोळ्यांत होतसे दाटी
उगवला दिवस मावळतो अंधार दाटतो रात्री
माउली नीज फिरवीते कर अपुले थकल्या गात्री
स्वप्नांत येउनी चिंता काळजा दुखविते देठी
रक्षिता तुम्ही स्वातंत्र्या प्राणांस घेउनी हाती
तुमच्यास्तव आमुची लक्ष्मी तुमच्यास्तव शेतीभाती
एकट्या शिपायासाठी झुरतात अंतरे कोटी
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - दत्ता डावजेकर
स्वर - आशा भोसले
चित्रपट - पाहू किती रे वाट (१९६३)
सावध हरिणी सावध ग, करील कुणी तरी पारध ग
रसरसलेली तुझी ग ज्वानी, चंचल नयनी गहिरे पाणी
घातक तुजला तुझी मोहिनी, सावध
उन्मादाचे अंगी वारे, पिसाट फिरता उरी कापरे
थरथर काळीज हलते रमणी, सावध
मादक धुंदी तुझीच सजणी, दिशात भरली नभात चढली
मोहाच्या क्षणी झापड नयनी, सावध
गीत - पी. सावळाराम
संगीत - विश्वनाथ मोरे
स्वर - जयवंत कुलकर्णी
चित्रपट - माय माउली (१९७१)
ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे अपुली
चुरुचुरु बोले तो तुरुतुरु चाले
नि कासवाने अंग हलविले
ससा जाई पुढे नि झाडामागे दडे
ते कासवाने हळू पाहीयले
वाटेत थांबलेना कोणाशी बोललेना
चालले लुटुलुटु पाही ससा
हिरवी हिरवी पाने नि पाखरांचे गाणे
हे पाहुनिया ससा हरखला
खाई गार चारा, घे फांदीचा निवारा
तो हळूहळू तेथे पेंगुळला
मिटले वेडे भोळे, गुंजेचे त्याचे डोळे
झाडच्या सावलीत झोपे ससा
झाली सांज वेळ तो गेला किती काळ
नि शहारली गवताची पाती
ससा झाला जागा तो उगा करी त्रागा
नि धाव घेई डोंगराच्या माथी
कासवा तेथे पाही ओशाळला मनी होई
"निजला तो संपला" सांगे ससा
गीत - शांताराम नांदगावकर
संगीत - अरुण पौडवाल
स्वर - उषा मंगेशकर
सर्वात्मका सर्वेश्वरा
गंगाधरा शिवसुंदरा ।
जे जे जगी जगते तया
माझे म्हणा करुणाकरा ॥
आदित्य या तिमिरात व्हा
ऋग्वेद या हृदयात व्हा
सुजनत्व द्या, द्या आर्यता
अनुदारता दुरिता हरा ॥
गीत - वि. वा. शिरवाडकर
संगीत - पं. जितेन्द्र अभिषेकी
स्वर - पं. जितेन्द्र अभिषेकी
नाटक - ययाति आणि देवयानी (१९६६)