चांद मातला, मातला, त्याला कशी आवरू ?
अंगी वणवा चेतला, मला कशी सावरू ?
अशी पुनवेची निशा, चढे चांदण्याची नशा
गेल्या हरवून दिशा, झाले खुळे पाखरू
आला समुद्र ही रंगा, त्याचा धिटाईचा दंगा
वेड्या लहरींचा पिंगा, बाई झाला की सुरू
गोड गारव्याचा मारा, देह शिरशिरे सारा
लाख चुंबनांचा मारा, चांद लागला करू
याची प्रेमपिशी दिठी, लावी चंदनाची उटी
घाली अनावर मिठी, कुठे धीर मी धरू ?
चांद अंगणी गगनी, चांद नांदतो भुवनी
चांद अमृताचा मनी, बाई लागला झरू
गीत - वसंत बापट
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - लता मंगेशकर
चित्रपट - उंबरठा (१९८१)
कोन्यात झोपली सतार, सरला रंग,
पसरली पैंजणे सैल टाकुनी अंग
दुमडला गालिचा, तक्के झुकले खाली
तबकात राहिले देठ, लवंगा, साली.
झुंबरी निळ्या दीपात ताठली वीज
का तुला कंचनी, अजुनी नाही नीज ?
थांबले रसिकजन होते ज्याच्यासाठी
ते डावलुनी तू दार दडपिले पाठी.
हळुवार नखलिशी पुनः मुलायम पान,
निरखिसी कुसर वर कलती करुनी मान
गुणगुणसी काय ते ? - गौर नितळ तव कंठी -
स्वरवेल थरथरे, फूल उमलते ओठी.
साधता विड्याचा घाट, उमटली तान,
वर लवंग ठसता होसी कशी बेभान ?
चित्रात रेखिता चित्र बोलले ऐने,
"का नीर लोचनी आज तुझ्या ग मैने ?"
त्या अधरफुलांचे ओले मृदुल पराग -
हालले, साधला भाव स्वरांचा योग,
घमघमे, जोगिया दंवांत भिजुनी गाता
पाण्यात तरंगे अभंग वेडी गाथा.
"मी देह विकुनिया मागुन घेते मोल,
जागविते प्राण हे ओपुनिया ’अनमोल’
रक्तांत रुजविल्या भांगेच्या मी बागा,
ना पवित्र देही तिळाएवढी जागा.
शोधीत एकदा घटकेचा विश्राम
भांगेत पेरुन तुळस परतला श्याम,
सावळा तरुण तो खराच गे वनमाली
लाविते पान ... तो निघून गेला खाली.
अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव,
पुसलेहि नाहि मी मंगल त्याचे नाव;
बोलला हळू तो दबकत नवख्यावाणी
"मम प्रीती आहे जडली तुजवर राणी !"
नीतिचा उघडिला खुला जिथे व्यापार
बावळा तिथे हा इष्का गणितो प्यार;
हासून म्हणाल्ये, "दाम वाढवा थोडा ...
या पुन्हा, पान घ्या ..." निघून गेला वेडा !
राहिले चुन्याचे बोट, थांबला हात,
जाणिली नाही मी थोर तयाची प्रीत,
पुन:पुन्हा धुंडिते अंतर आता त्याला
तो कशास येईल भलत्या व्यापाराला ?
तो हाच दिवस हा, हीच तिथी, ही रात,
ही अशीच होत्ये बसले परी रतिक्लांत,
वळुनी न पाहता, कापित अंधाराला
तो तारा तुटतो - तसा खालती गेला.
हा विडा घडवुनी करिते त्याचे ध्यान,
त्या खुळ्या प्रीतीचा खुळाच हा सन्मान;
ही तिथी पाळिते व्रतस्थ राहुनी अंगे
वर्षात एकदा असा ’जोगिया’ रंगे.
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सी. रामचंद्र
स्वर - फैयाज
चित्रपट - घरकुल (१९७०)
अवं हे गाव लई न्यारं, हितं थंड गार वारं
याला गरम शिणगार सोसंना
ह्याचा आधाशाचा तोरा, ह्याचा कागद हाय कोरा
हितं शाहिरी लेखणी पोचंना
हितं वरण भाताची गोडी रं, नको फुकट छेडाछेडी रं
अरं सोंगा ढोंगाचा बाजार हिथला, साळसूद घालतोय् अळीमिळी
अन् सार वरपती, रसा भुरकती, घरात पोळी अन् भायेर नळी रं, रं, रं
अगं चटक चांदणी, चतूर कामिनी
काय म्हनू तुला तू हायेस तरी कोन
छ्बीदार छ्बी मी तोऱ्यात उभी, जशी चांदणी चमचम नभी
अवं दाजिबा, गावात होईल शोभा, हे वागणं बरं नव्हं
नवतीचं रान हे भवतीनं, फिरत आले मी गमतीनं
बांधावरनं चालू कशी, पाठलाग ह्यो टाळू कशी
अरं लाजमोड्या, भलत्याच करतोयस खोड्या, हे वागणं बरं नव्हं
डौल दावतो मोराचा, तिरपा डोळा चोराचा
वढ्याच्या काठाला आडिवतो, अंगावर पानी उडिवतो
अरं बजरंगा, नकोस घालू पिंगा, हे वागणं बरं नव्हं
मिरचीचा तोरा मी करते रं, वट्यात ऐवज भरते रं
पदर माझा धरतोस कसा, भवतीनं माझ्या फिरतोस कसा
अरं बत्त्ताशा, कशाला पिळतोस मिशा, हे वागणं बरं नव्हं
हिरवी शेतं दरवळली, टपोरी कणसं मोहरली
शिळ घालूनी करतोस खूणा, घडीघडी हा चावटपणा
अरं मर्दा, अब्रूचा होईल खुर्दा, हे वागणं बरं नव्हं
गीत - जगदीश खेबुडकर
संगीत - राम कदम
स्वर - उषा मंगेशकर
चित्रपट - पिंजरा (१९७७)
छम् छम् छम् ..... छम् छम् छम्
छडी लागे छ्मछ्म, विद्या येई घमघम
छम् छम् छम् ..... छम् छम् छम्
मोठ्या मोठ्या मिश्या, डोळे एवढे एवढे लाल
दंतोजींचा पत्ता नाही, खप्पड दोन्ही गाल
शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम
छम् छम् छम्
तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी भिंती झाल्या घाण
पचापचा शिव्या देई खाता खाता पान
"मोऱ्या मूर्खा- !", "गोप्या गद्ध्या !", देती सर्वा दम
छम् छम् छम्
तोंडे फिरवा, पुसती गिरवा, बघु नका कोणी
हसू नका, रडू नका, बोलु नका कोणी
म्हणा सारे एकदम, ओ नमा सिद्ध्म्
छम् छम् छम्
गीत - वसंत बापट
संगीत - वसंत देसाई
स्वर - पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट - श्यामची आई (१९५३)
जन पळभर म्हणतिल ’हाय हाय’ !
मी जाता राहिल कार्य काय ?
सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल,
तारे अपुला क्रम आचरतिल,
असेच वारे पुढे वाहतिल,
होईल काहि का अंतराय ?
मेघ वर्षतिल, शेते पिकतिल,
गर्वाने या नद्या वाहतिल,
कुणा काळजी की न उमटतिल,
पुन्हा तटावर हेच पाय ?
सखेसोयरे डोळे पुसतिल,
पुन्हा आपुल्या कामि लागतिल,
उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल
मी जाता त्यांचे काय जाय ?
रामकृष्णही आले, गेले !
त्याविण जग का ओसचि पडले ?
कुणी सदोदित सूतक धरिले ?
मग काय अटकले मजशिवाय ?
अशा जगास्तव काय कुढावे !
मोहि कुणाच्या का गुंतावे ?
हरिदूता का विन्मुख व्हावे ?
का जिरवु नये शांतीत काय ?
गीत - भा. रा. तांबे
संगीत - वसंत प्रभू
स्वर - लता मंगेशकर
चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले
ओंजळी उधळीत मोती हासरी ताराफुले
वाहती आकाशगंगा की कटीची मेखला
तेजपुंजाची झळाळी तार पदरा गुंफीले
गुंतविले जीव हे मंजीर की पायी तुझ्या
जे तुझ्या तालावरी, बोलावरी नादावले
गे निळावंती कशाला झाकशी काया तुझी ?
पाहु दे मेघाविण सौंदर्य तूझे मोकळे
गीत - राजा बढे
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - आशा भोसले
पान जागे फूल जागे, भाव नयनी जागला,
चंद्र आहे साक्षिला, चंद्र आहे साक्षिला
चांदण्याचा गंध आला, पौर्णिमेच्या रात्रिला,
चंद्र आहे साक्षिला, चंद्र आहे साक्षिला !
स्पर्श हा रेशमी, हा शहारा बोलतो
सूर हा, ताल हा, जीव वेडा डोलतो
रातराणीच्या फुलांनी, देह माझा चुंबिला !
लाजरा, बावरा, हा मुखाचा चंद्रमा
अंग का चोरिसी, दो जीवांच्या संगमा
आज प्रीतीने सुखाचा, मार्ग माझा शिंपिला !
गीत - जगदीश खेबुडकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - आशा भोसले, सुधीर फडके
चित्रपट - चंद्र होता साक्षीला (१९७८)
झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेखा हवेत काढी
पळती झाडे पाहूया,
मामाच्या गावाला जाऊया
मामाचा गाव मोठा
सोन्याचांदीच्या पेठा
शोभा पाहुनी घेऊया
मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली पोरटी
भाच्यांची नावे सांगूया
मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामन खाऊया
मामा मोठा तालेवार
रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी लेऊया
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - वसंत पवार
स्वर - आशा भोसले
चित्रपट - तू सुखी रहा (१९६३)
जीवनगाणे गातच रहावे
झाले गेले विसरुनि जावे, पुढे पुढे चालावे
जीवनगाणे गातच रहावे !
सात सुरांचा हा मेळा व्यापुन उरला विश्वाला
हृदय हालता वरखाली ताल मिळे या गाण्याला
तुमच्या माझ्या श्वासांमधुनी आकारा यावे
जीवनगाणे गातच रहावे !
चिमणाबाई हिरमुसली गाल फुगवुनी का बसली ?
सान बाहुली ही इवली लटकी लटकी का रुसली ?
रुसली रुसली, खुदकन हसली, पापे किति घ्यावे !
जीवनगाणे गातच रहावे !
मातीमधुनी अंकुरली चैतन्याची दीपकळी
आनंदाने थरथरली कधी अंतरी गहिवरली
या प्रीतीला, या मातीला हितगुज सांगावे
जीवनगाणे गातच रहावे !
गीत - शांता शेळके
संगीत - राम-लक्ष्मण
स्वर - उषा मंगेशकर, महेंद्र कपूर
चित्रपट - आपली माणसं (१९७९)