ठाऊक नाही मज काही !
ठाऊक आहे का तुज काही,
कशी होती रे माझी आई ?
मऊ जशी ती साय दुधाची,
होती आई का तशी मायेची ?
बागेतील ते कमल मनोहर,
आई होती का तशीच सुंदर ?
देवाघरी का एकटी जाई ?
ठाऊक आहे का तुज काही,
कशी होती रे माझी आई ?
चिउकाऊची कथा चिमुकली,
सांगत होती का ती सगळी ?
अम्हांसारखे शुभंकरोती,
म्हणे रोज का देवापुढती ?
गात असे का ती अंगाई ?
ठाऊक आहे का तुज काही,
कशी होती रे माझी आई ?
मऊ साइहुन आई प्रेमळ !
गंगेहून ती आहे निर्मळ
अमृताचे घास भरविते
आभाळापरी माया करीते
आईवाचून मीही विरही
ठाऊक आहे का तुज काही,
कशी होती रे माझी आई ?
गीत - मधुसूदन कालेलकर
संगीत - राम कदम
स्वर - स्नेहल भाटकर, वसुमती दोंदे
चित्रपट - एक धागा सुखाचा ( १९६०)
टाळ बोले चिपळीला, नाच माझ्यासंग
देवाजीच्या दारी आज, रंगला अभंग
दरबारी आले, रंक आणि राव
सारे एकरूप, नाही भेदभाव
गाउ नाचु सारे, होउनी निःसंग
जनसेवेपायी, काया झिजवावी
घाव सोसुनिया, मने रिझवावी
ताल देउनी हा, बोलतो मृदंग
ब्रम्हानंदी देह, बुडुनीया जाई
एक एक खांब, वारकरी होई
कैलासाचा नाथ, झाला पांडुरंग
गीत - जगदीश खेबुडकर
संगीत - राम कदम
स्वर - पं. भीमसेन जोशी, पं. वसंतराव देशपांडे
चित्रपट - भोळी भाबडी (१९७२)
जीवा-शीवाची बैल जोडं, लावील पैजंला आपली कुडं
डौल मोराच्या मानाचा रं, डौल मानाचा
येग रामाच्या बानाचा रं, येग बानाचा
तान्या-सर्जाची हं नाम जोडी
पुना होवीस हाती घोडी, माझ्या राजा रं
धरती आबाळाची चाकं
त्याच्या दुनवेची हो गोडी
सुर्व्या-चंद्राची हो जोडी
त्याच्या सर्गाची रं माडी, सर्गाची माडी
सगळी शंकराची माया
इष्णू लक्षिमीचा राया
सूर परकरतीची जोडी
डाव परपंचाचा मांडी, माझ्या राजा रं
गीत - योगेश
संगीत - आनंदघन
स्वर - पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट - तांबडी माती (१९६९)
डोळे हे जुलमि गडे
रोखुनि मज पाहु नका
जादुगिरी त्यात पुरी
येथ उभे राहु नका
घालु कशी कशिदा मी ?
होति किती सांगु चुका !
बोचे सुइ फिरफिरुनी
वेळ सख्या, जाय फुका
खळबळ किती होय मनी !
हसतील मज सर्वजणी
येतिल त्या संधि बघुनि
आग उगा लावु नका !
गीत - भा. रा. तांबे
संगीत - वसंत प्रभू
स्वर - आशा भोसले
राग - मिश्र मारुबिहाग (नादवेध)