Sunday, May 20, 2012
Text Size
सानेगुरुजींच्या गोष्टी
सानेगुरुजींच्या गोष्टी

सानेगुरुजींच्या गोष्टी (3)

एक होता राजा. त्याला एक मुलगा होता. एकुलता एक मुलगा म्हणून राजा-राणी त्याला जीव की प्राण करीत. परंतु लाडामुळे तो बिघडला. राजा मनात म्हणाला 'याला घालवून द्यावे. टक्केटोणपे खाऊन शहाणा होऊन घरी येईल.' राजाने राणीला हा विचार सांगीतला.

"आज ना उद्या सुधारेल तो. नका घालवू त्याला दूर !" ती रडत म्हणाली.

"तुम्हा बायकांना कळत नाही. आज त्याला हाकलून देणे तुला कठोरपणाचे वाटले तरी तेच हिताचे आहे." तो म्हणाला.

राणी काय करणार काय बोलणार ? रात्रभर तिला झोप आली नाही. सकाळी राजा मुलाला म्हणाला "राज्यातून चालता हो. आपण आता शहाणे झालोत असे वाटेल तेव्हा घरी ये !"

"तुमची आज्ञा प्रमाण " असे म्हणून पित्याच्या पाय पडून तो आईचा निरोप घ्यायला गेला. तो आईच्या पाया पडला. आईने त्याला पोटाशी धरले.

"हे घे चार लाडू. भूक-तहानेचे लाडू. " ती म्हणाली.

आईचां आशीर्वाद घेऊन ते लाडू घेऊन धनुष्यबाण नि तलवार घेऊन तो निघाला. पायी जात होता. दिवस गेला रात्र गेली. चालत होता. थकल्यावर दगडाची उशी करून झाडाखाली झोपे. पुन्हा उठे नि चालू लागे. त्याला भूक लागली. त्या लाडूंची त्याला आठवण झाली. एक झरा खळखळ वाहत होता. हात-पाय धुऊन तेथे बसला. त्याने एक लाडू फोडला तो आतून एक रत्न निघाले. त्याला आनंद झाला. आईला किती चिंता ते मनात येऊन त्याचे डोळे भरून आले. लाडू खाऊन पाणी पिऊन तो पुढे निघाला तो त्याला एक हरिणी दिसली. तिच्याभोवती तिची पाडसे खेळत होती. राजपुत्राने धनुष्याला बाण लावला. तो त्या हरिणीला मारणार होता; परंतु त्याला स्वत:ची आई आठवली. माझी आई मला तशी ही हरिणी या पाडसांना. त्याचे हृदय द्रवले. त्याने बाण परत भात्यात ठेवला. तो पुढे निघाला. काही अंतर चालून गेल्यावर मागून कोणीतरी माणूस येत आहे असे त्याला वाटले. एक स्त्री येत होती. साधीभोळी निष्पाप दिसत होती. तो थांबला. ती स्त्री जवळ आली.

"कोण तुम्ही कुठल्या ? या रानावनातून एकटया कुठे जाता ? "

"मी तुझी बहीण होऊ इच्छिते. मला नाही म्हणू नकोस." ती म्हणाली.

"ये माझ्याबरोबर. भावाला बहीण झाली." तो म्हणाला.

दोघे जात होती. दोघांना भूक लागली. एका खळखळ वाहणार्‍या झर्‍याच्या काठी दोघं बसली. त्याने एक लाडू फोडला. त्यातून पुन्हा एक रत्न निघाले. अर्धा अर्धा लाडू दोघांनी खाल्ला. इतक्यात केविलवाणा शब्द कानी आला. एका सापाने बेडकाला तोंडात धरले होते. बेडुक वाचवावा तर सापाची भूक कशी शमवायची ? राजपुत्राने जवळच्या तलवारीने मांडीचे मांस कापून सापाकडे फेकले. तो लाल तुकडा पाहून बेडकाला सोडून साप तिकडे धावला. बेडूक टुणटुण उडया मारीत गेला. सापाची भूक शमली ; बेडकाचेही प्राण वाचले.

भगवान श्रीकृष्ण गोकुळात अवतरले होते. नंदराजाच्या घरी गाईंचे मोठे खिल्लार होते. स्वत: कृष्ण गाईंना रानात चरावयास घेऊन जाई. त्या गाईंमध्ये बहुला नावाची एक सुंदर गाय होती. तिचा रंग काळासावळा होता. ती पुष्कळ दूध देई म्हणून तिला बहुला म्हणत. तिची कृष्णदेवावर फार भक्ती होती. एक क्षणभरसुद्धा कृष्णदेवाला ती विसंबत नसे. नेहमी कृष्णाच्या जवळजवळ असावयाची मधून मधून त्याच्याकडे बघावयाची.


कृष्णाची मुरली वाजूलागली तर खाणेपिणे सारे ती विसरत असे व तिच्या डोळयांतून आनंदाश्रू घळघळ गळत. एके दिवशी ह्या बहुला गाईचे सत्व बघावे अशी कृष्णदेवास इच्छा झाली. भक्तांचा अंकित होण्यापुर्वी परमेश्वर त्यांची परीक्षा घेत असतो. गाई घेउन राजेच्याप्रमाणे श्रीकृष्ण परमा त्मा वनात गेला. यमुनेच्या तीरावर गाई चरू लागल्या. गोपाळ खेळू लागले. त्या दिवशी बहुलेला श्रीकृष्णाने भूल पाडली. बहुला हिरवे हिरवे गवत पाहून चरत चरत लांबवर गेली. कृष्णापासून दूर न जाणारी बहुला कृष्णाला सोडून दूर गेली. तिला स्थळाचे व वेळेचे भान राहिले नाही. 

सायंकाळ होत आली. सूर्य मावळण्याची वेळ झाली. कृष्णदेवाने घरी परत जाण्याची खूण म्हणून मुरली वाजवली. सार्‍या गाई गोळा झाल्या. गुराखी कृष्णासह गाई घेऊन घरी निघाले. गोठयातून वासरे हंबरत होती. हंबरून गाई उत्तर पाठवीत होत्या. गाई गोठयात घूसल्या. वासरे कासेला लागली व ढुशा देऊन देऊन भरपूर दूध पिऊ लागली. परन्तु बहुला कोठे आहे बहुलेचा बाळ घरी होता. तिच्या वासराचे नाव डुबा होते.

 

गोजिरवाणा || बहुलेचा बालक तान्हा ||
काळे त्याचे आंग सुंदर 
कपळावरी चांद मनोहर 
जसा चन्द्रमा निळया नभावर 
तैसा जाणा || बहुलेचा बालक तान्हा ||
खुंट रुप्याचा बांधायाला 
सोन-साखळी घालायाला 
डुबा आवडे अति सकळांला 
मोहन साना || बहुलेचा बालक तान्हा ||

 

एक होता गाव. त्या गावात एक गृहस्थ राहत होता. त्याला एक मुलगी होती. त्या मुलीचे नाव सोनसाखळी. सोनसाखळी लहान असतानाच तिची आई मेली. सोनसाखळीच्या बापाने दुसरे लग्न केले.

सोनसाखळी बापाची लाडकी होती. तो आपल्याजवळ तिला जेवायला घेई. आपल्या जवळ निजायला घेई. तिच्या जवळ कितीतरी खेळ किती बाहुल्या किती बुडकुली. बाप सोनसाखळीला नवीन नवीन परकर शिवी. छान छान झबली शिवी. तिच्यासाठी त्याने कितीतरी दागिने केले होते.

सोनसाखळीचा असा थाट होता. जेवायला बसताना रंगीत पाट पाणी पिण्याला रुप्याची झारी. जेवताना सोनसाखळी बापाला म्हणे "बाबा मला भरवा. मी मोठी झाले, म्हणून काय झाले ?" मग प्रेमाने बाप तिला घास देई.

सोनसाखळीचा बाप एकदा काशीस जावयास निघाला. ते जुने दिवस. सहा महिने जायला लागत सहा महिने यायला लागत. बाप सोनसाखळीच्या सावत्र आईला म्हणाला "हे बघ मी दूर जात आहे. माझ्या सोनसाखळीस जप. आईवेगळी पोर. तिला बोलू नको मारू नको. पोटच्या मुलीप्रमाणे तिचे सारे कर."

सावत्र आई म्हणाली "हे मला सांगायला हवे ? तुम्ही काळजी नका करू. सोनसाखळीचे सारे करीन. तिला गुरगुटया भात जेवायला वाढीन कुशीत निजायला घेईन. न्हाऊमाखू घालीन वणीफणी करीन. जा हो तुम्ही. सुखरूप परत या."

सोनसाखळीचा बाप गेला. सावत्र आईचा कारभार सुरू झाला. ती सोनसाखळीचा छळ करू लागली. लहान कोवळी सोनसाखळी. परंतु तिची सावत्र आई तिला पहाटे थंडीत उठवी. सोनसाखळी झाडलोट करी भांडी घाशी. ती विहिरीवरून पाणी आणत असे. तिला पोटभर खायला मिळेना. शिळेपाके तिला तिची सावत्र आई वाढत असे. रात्री पांघरायलाही नसे. सोनसाखळी रडे. परंतु रडली तर तिला मार बसत असे.

एक दिवशी तर तिच्या कोवळया हाताला सावत्र आईने डाग दिला. फुलासारखा हात त्याच्यावर त्या दुष्ट आईने निखारा ठेवला. असे हाल सुरू झाले. सोनसाखळी बापाला घरी आल्यावर हे सारे सांगेल अशी भीती सावत्र आईस वाटत होती. म्हणून एके दिवशी रात्री तिने सोनसाखळीस ठार मारले. एका खळग्यात तिचे तुकडे पुरण्यात आले. त्या खळग्यावर सावत्र आईनं डाळिंबाचे झाड लावले.