Sunday, May 20, 2012
Text Size
इसापनिती
इसापनिती

इसापनिती (51)

एकदा, जनावरांचा राजा सिंह मरण पावला. तेव्हा दुसरा राजा शोधण्यासाठी प्राणी एकत्र जमले. तेव्हा वानराने वेडयावाकड्या नकला करून प्राण्यांना हसविले व युक्तीने तो राजा झाला. कोल्ह्यला याचा फार राग आला.

त्याने वानराची खोड मोडण्याचे ठरविले. एके दिवशी एका शेतकर्‍याने एक सांपळा लावून ठेवला होता. कोल्ह्याने तो पाहिला व वानरापाशी आला व म्हणाला, 'महाराज, आपल्याला खूपसं खोबरं हवं असेल तर माझ्याबरोबर चला, मी दाखवतो.'

वानराच्या तोंडाला पाणी सुटले व तो कोल्ह्याबरोबर निघाला. तेव्हा कोल्ह्याने त्या सापळ्यातले खोबरे दाखविले. ते घेण्यासाठी वानराने हात घातल्याबरोबर चाप बसून त्याची बोटे त्यात अडकली. तेव्हा कोल्हा हसत हसत म्हणाला, 'अरे, तू तर राजा आहेस, तुला हा सापळासुद्धा ओळखता येत नाही ?'

- {Khapre.org} वरून साभार

एका शेतकर्‍याने कोल्ह्याला पकडण्यासाठी एक सापळा लावून ठेवला होता. एके दिवशी त्यात एक लठ्ठ कोल्हा सापडला. त्याला अडकलेले एका कोंबड्याने पाहिले व तो हळूहळू त्या सापळ्यापाशी आला आणि कोल्ह्याकडे बघत राहिला.

त्याला पाहून कोल्ह्याला एक युक्ती सुचली आणि तो ढोंगीपणाने म्हणाला-

'मित्रा, पहा बरं, मी कसा संकटात सापडलो आहे ते ! आणि हे सगळं तुझ्याचमुळे झालं. मी पहाटे तुझा आवाज ऐकला आणि म्हणून तुझी काय हालहवाल ते विचारण्यासाठी मी इथे आलो आणि या सापळ्यात अडकलो. तर तू मला एक काठी आणून दे म्हणजे मी माझी सुटका करून घेईन.'

हे ऐकून कोंबडा घरी गेला आणि त्याने शेतकर्‍याला कोल्हा पिंजर्‍यात अडकला आहे असे सांगितले. तेव्हा शेतकरी मोठा सोटा घेऊन आला आणि त्याने त्या कोल्ह्याला खरपूस मार दिला. त्या माराने कोल्हा मरण पावला.

- {Khapre.org} वरून साभार

एकदा एक खाटीक आपल्या दुकानात बेसावधपणे बसला होता. तेव्हा त्याच्या दुकानातून एका कुत्र्याने मांसाचा तुकडा पळवला. ते पाहून खाटीक त्याला म्हणाला, 'मित्रा, तू मांस चोरून मला जे शहाणपण शिकविलेस ते मी कधीही विसरणार नाही.

तात्पर्य - आपली एखादी वस्तू गेल्याखेरीज शहाणपण येत नाही.

- {Khapre.org} वरून साभार

एका मनुष्याने एक कवडा जाळ्यात पकडला. त्या माणसाने एका कुंपणात बर्‍याचशा कोंबड्या ठेवल्या होत्या. त्यांच्यात त्या कवड्याला नेऊन सोडले. या नवीन पाहुण्याला पाहून कोंबड्यांनी त्याला टोचून टोचून खूप त्रास दिला. यानंतर थोड्या वेळाने ते कोंबडे जेव्हा एकमेकांच्यात भांडू लागले तेव्हा कवडा म्हणाला-

'हे जर आपआपसांतच इतकी मारामारी करतात तर माझ्यासारख्या परक्याला त्रास दिला यात काहीच आश्चर्य नाही.'

तात्पर्य - जे मूळचेच भांडखोर असतात, त्यांच्याकडून चांगल्या वागण्याची अपेक्षा कधी करू नये.

- {Khapre.org} वरून साभार

एकदा एक करडू बोकडाबरोबर चरत होते. तेव्हा एक लांडगा तेथे आला व करडाला म्हणाला, 'तू असा आपल्या आईला सोडून आलास हे बरं नाही. तिथे तुला पोटभर दूध प्यायला मिळालं असतं. इथे रानात काय मिळणार ? चल, मी तुला आईकडे नेतो.' करडू म्हणाले, 'माझं रक्षण करण्यासाठीच आईनं मला या बोकडाबरोबर पाठविलं आहे. त्याच्यापासून दूर नेऊन तू मला खाशील. तू निश्चितच लबाडीचं बोलतो आहेस, हे मला कळतं आहे !'

तात्पर्य - फसवणारा कितीही गोड बोलला तरी त्याच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवू नये.

- {Khapre.org} वरून साभार

एका शेतकर्‍याच्या दारात सिताफळांचे मोठे झाड होते. त्यास खूप गोड आणि मधुर फळे येत. एके दिवशी त्याने त्यातली काही फळे आपल्या मालकाला नेऊन दिली. त्याला फळे इतकी आवडली की, त्याने लगेच तेथून ते झाड उपटले आणि आपल्या दारात नेऊन लावले.

परंतु, ते झाड नंतर वाळून गेले व त्याला काही गोड, मधुर फळे आली नाहीत.

ही गोष्ट त्या शेतकर्‍याने ऐकली तेव्हा तो म्हणाला, 'अधाशीपणानं असंच होतं. हे झाड जर इथेच राहिलं असतं तर आम्हा दोघांनाही फळ खायला मिळाली असती.'

तात्पर्य - जी वस्तु एका जागी फलदायी होते ती इतर ठिकाणी होत नाही.


- {Khapre.org} वरून साभार

एका शेतकर्‍याच्या दारात सिताफळांचे मोठे झाड होते. त्यास खूप गोड आणि मधुर फळे येत. एके दिवशी त्याने त्यातली काही फळे आपल्या मालकाला नेऊन दिली. त्याला फळे इतकी आवडली की, त्याने लगेच तेथून ते झाड उपटले आणि आपल्या दारात नेऊन लावले.

परंतु, ते झाड नंतर वाळून गेले व त्याला काही गोड, मधुर फळे आली नाहीत.

ही गोष्ट त्या शेतकर्‍याने ऐकली तेव्हा तो म्हणाला, 'अधाशीपणानं असंच होतं. हे झाड जर इथेच राहिलं असतं तर आम्हा दोघांनाही फळ खायला मिळाली असती.'

तात्पर्य - जी वस्तु एका जागी फलदायी होते ती इतर ठिकाणी होत नाही.


- {Khapre.org} वरून साभार

एक तहानलेला घोडा एका ओढ्यावर पाणी पिण्यास गेला असताना एक रानडुक्कर पाण्यात डुंबत असलेला त्याने पाहिला. तो रानडुक्कर घोड्याला पाणी पिऊं देईना, तेव्हा घोडा चिडला व दोघे भांडू लागले. तेव्हा घोड्याने एका माणसास, रानडुकराला ठार करण्याची विनंती केली. त्या माणसाने हातात शस्त्रे घेतली आणि घोड्यावर बसून तो निघाला. ओढ्याजवळ येताच त्याने रानडुकराला बाण मारून ठार केले. ते पाहून घोड्यास खूप आनंद झाला. परंतु, त्या माणसाने त्यास सोडले नाही. तो म्हणाला, 'मला तुझा खूपच चांगला उपयोग होईल. तेव्हा मी तुला माझ्या तबेल्यात बांधणार.' हे ऐकताच एका साध्या गोष्टीसाठी आपण आपले स्वातंत्र्य कायमचे गमावल्याबद्दल घोड्याला वाईट वाटले.

तात्पर्य - दुसर्‍याचा पाडाव करण्यासाठी जेव्हा आपण एखाद्याची गुलामगिरी पत्करतो, तेव्हा आपण कायमचेच गुलाम होतो.


- {Khapre.org} वरून साभार

एकदा एका पारध्याने जाळ्यात एक गरुडपक्षी पकडला व त्याचे पंख कापून त्याला एका खांबास बांधून ठेवले. शेजारीच दुसरा एक शिकारी मनुष्य रहात असे, त्यास ते पक्ष्याचे हाल पाहावेनात. त्याने तो पक्षी विकत घेतला व त्याचे चांगले पालनपोषण करून त्याला पंख फुटल्यावर सोडून दिले. गरुडाला फार आनंद झाला. त्याने एक उंच भरारी मारून रानातून एक ससा पकडून आणला व कृतज्ञता म्हणून त्या माणसास दिला.

हा सर्व प्रकार एक कोल्हा पहात होता. तो म्हणाला, 'मित्रा, मी जर तुझ्याजागी असतो तर हा ससा मी त्या पारध्याला दिला असता कारण त्यामुळे नंतर त्याच्यापासून काही उपद्रव झाला नसता. हा मनुष्य काही तुला त्रास देणार नाही. तेव्हा त्याला खूष ठेवण्याचं काही कारण नाही.

यावर गरुड म्हणाला, 'मित्रा, हे चूक आहे. ज्याने आपल्याला मदत केली त्याला कृतज्ञता दाखवावी व जे त्रास देतात त्यांच्यापासून सावधगिरीनं वागावं.'


- {Khapre.org} वरून साभार

एकदा एक मनुष्य आजारी पडला. सगळ्या वैद्यांनी तो काही आता जगणार नाही, असेच सांगितले. तेव्हा त्या माणसाने देवाला नवस केला व म्हटले, देवा, 'मला दुखण्यातून वाचवलंस तर मी तुला हजार पुतळ्या घालीन.'

हे ऐकून त्याची बायको त्याला म्हणाली, 'असला अशक्य नवस तुम्ही बोलू नका. आपल्याला ते शक्य होणार नाही.'

तेव्हा तो मनुष्य म्हणाला, 'देव कुठे त्या हजार पुतळ्यांसाठी आपल्या दारात येणार आहे. त्याला दुसरे पुष्कळ उद्योग आहेत.'

पुढे तो मनुष्य खरेच बरा झाला व त्याने पिठाच्या हजार पुतळ्या करून देवाला दिल्या. ते पाहून देव भयंकर चिडला व तो भूताचे सोंग घेऊन त्या मनुष्याच्या स्वप्नात गेला व म्हणाला, 'अरे, तू रानात डोंगराच्या पायथ्याशी खणून पहा, तुला तिथे द्रव्य मिळेल.'

दुसरे दिवशी तो मनुष्य द्रव्याच्या लोभाने रानात गेला. तेव्हा त्याला रानात चोरांनी पकडले व त्याचे काही एक न ऐकता गुलाम म्हणून विकून टाकले.

तात्पर्य - नुसत्या गप्पा मारून चालत नसते. तसे करणारा मनुष्य केव्हातरी गोत्यात येतोच.


- {Khapre.org} वरून साभार
<< Start < Prev 1 2 3 4 Next > End >>
Page 1 of 4